Monday, November 12, 2018

।। श्रीलक्ष्मी कुबेर पुजन कसे करावे ।।


                                                               श्रीलक्ष्मी कुबेर पुजन कसे करावे              
                                                                          पुजेसाठी लागणारे साहित्य
१) चौरंग २) पाट ३) दोन कलश ४) दोन ताम्हणे ५) पळी ६) पंचपात्री ७) तेलवाती सह समयी ८) तुपवातीसह निरांजन ९) घंटा १०) शंख ११) तिर्थासाठी व नैवेद्यासाठी भांडे १२) श्री विष्णु/बाळकृष्ण मुर्ती किंवा फोटो १३) श्री लक्ष्मी मुर्ती/फोटो १४) श्री कुबेर मुर्ती/फोटो १५) श्री गणेश मुर्ती १६) श्रीयंत्र १७) श्री सरस्वती मुर्ती/फोटो १८) सुटी नाणी १९) उदबत्ती २०) नैवेद्यासाठी साखर २१) गुळ २२) खोबरे २३) फुलाचे हार २४) झेंडुची फुले व दुर्वा २५) मध २६) पंचामृत २७) आंब्याचा डहाळा २८) २ नारळ २९) १० विड्याची पाने ३०) १५ लहान सुपार्‍या ३१) पाच फळे ३२) बत्तासे ३३) लाह्या ३४) रांगोळी ३५) हळद कुंकू ३६) मंगळसुत्र ३७) कमळाचे फुल ३८) देवीसाठी व घरील स्त्रियांसाठी वेणी किंवा गजरा ३९) २ ब्लाऊज पीस ४०) कापुर ४१) तुळशी पाने ४२) रोकड रुपये (तुमच्या इच्छेनुसार) ४३) काडीपेटी ४४) नवीन झाडु  ४५) अक्षता (अखंड तांदुळ) ४६) झाडु 
         
चौदा वर्षाचा वनवास संपवुन श्री राम अयोध्येत परत आले त्यावेळी प्रजेने दिपोत्सव केला त्यावेळी पासुन दिपावली साजरी करतात. लक्ष्मीपुजनाच्या दिवशी श्रीविष्णुने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातुन मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे.  सामान्यतः अमावस्या हा अशुभ दिवस म्हणुन मानला जातो; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. (दरवर्षी श्रीलक्ष्मी पुजन हे अमावस्येलाच असते) म्हणुन हा दिवस शुभ मानला आहे; पण तो सर्व कामांना शुभ नाही; म्हणुन या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य. श्री लक्ष्मीपुजन घरात असो अथवा दुकानात असो पुजाविधीमध्ये कोणताच फरक नाही. घरात हिशोबाच्या वह्या लेखण साहित्य ठेवावे लागत नाही. दुकानात मात्र जमाखर्चाच्या वह्या दौत लेखणी इत्यादी लेखन साहित्य, तिजोरी, तराजु, संगणक यांची विशिष्ट मंत्राने पुजा करावी लागते. श्रीलक्ष्मीपुजन शास्त्रोक्त विधीने, पुराणोक्त मंत्रांनी व भावपुर्ण मनाने करावे.            
दुकानात नव्या वह्यांवर कुंकवाने स्वस्तिक काढावे. सुरुवातीच्या पानावर श्रीगणेश, श्रीलक्ष्मी, श्रीसरस्वती, आपली कुळदेवता व आपली उपास्य/इष्ट देवता (राशीप्रमाणे) अशी पाच नावे लिहावीत.
स्वस्तिकाच्या वरच्या बाजुस “श्री” असे लिहावे. स्वस्तिकाच्या एका बाजुस “शुभ” व दुसर्‍या बाजुस “लाभ” असे कुंकवाने लिहावे. व खालच्या बाजुस “शुभमस्तु” अशी अक्षरे काढावीत. नंतर पुजनास प्रारंभ करावा.
घराच्या किंवा दुकानाच्या दारावर आंब्याच्या / अशोकाच्या पानांचे व झेंडुच्या फुलांचे तोरण बांधावे.
पुजा करताना सर्व साहित्य जवळच ठेवावे. स्वताला उजव्या हाताच्या मधल्या बोटाने गंध लावावे. देवीला अनामिकेने कुंकू लावावे. अक्षता उजव्या हाताची अनामिका, मधले बोट व अंगठा यांच्या चिमटीने वाहाव्यात. विड्याची पाने उताणी व देठ देवीकडे करून ठेवावीत वर सुपारी ठेवावी. नारळाची शेंडी देवीच्या दिशेला ठेवावी. देवीला निरांजन, उदबत्ती व कापुर आरती ह्यांनी ओवाळताना ते उजव्या हाताने खालुन आपल्या डावीकडुन वर व वरुन उजवीकडे खाली अशी देवीवर प्रकाश पाडीत ओवाळावी, त्या वेळी डाव्या हाताने घंटानाद करावा. आपल्या डाव्या बाजुला पुजेचा तांब्या ठेवावा. उजव्या हाताला पुजेचे साहित्य ठेवावे. उजव्या बाजुला तुपाचे निरांजन व डाव्या बाजुला समई ठेवावी. पुजेला पुर्वाभिमुख बसावे.
घर नेहमी स्वच्छ असावे नियमित साफ सफाई असावी कारण त्याच ठिकाणी श्रीलक्ष्मीचा वास्तव्य असते. म्हणुन लक्ष्मीपुजनाच्या अगोदर घराची पुर्ण स्वच्छता करावी. असतो श्रीलक्ष्मी-पुजन केल्याने घरात सुखसमृद्धी नांदते. दुकानात व्यापारवृद्धी होते. ज्या घरात दीपोत्सव, श्रीलक्ष्मीपुजन केले जाते तिथे धनधान्याची कधीही तुटवडा पडत नाही. तिथे ऐश्वर्य वैभव श्रीमंती येते. श्रीलक्ष्मी तिथे निरंतर वास करते. कल्याण होते, यश प्राप्ती होते.
                                           श्रीलक्ष्मीपुजनाच्या दिवशी काढावयाची रांगोळी

    
                                                            पुजेची रचना
     लक्ष्मीपुजन करणार्‍याने नवीन कपडे परिधान करावीत. बसण्यासाठी लोकरीचे आसन किंवा दर्भाचे आसन वापरावे, शक्यतो जमिनीवर किंवा पाटावर बसु नये. आपल्या कपाळाला केशराचा किंवा कुंकवाचा तिलक लावावा. पुजेच्या ठिकाणी चौरंग ठेवावा. चौरंगा सभोवती रांगोळी काढावी. चौरंगावर रेशमी रुमाल किंवा लाल ब्लाऊज मांडावा. आणि त्यावर तांदळाने अष्टदल काढावे ( खालील चित्राप्रमाणे). चौरंगाच्या चारही बाजुंना रांगोळी काढावी.  


                                      थोडक्यात लक्ष्मी-कुबेर-विष्णु-नवग्रह पुजन मांडणी
    अक्षताने चौरंगावर अष्टदल काढल्यावर त्यावर कलश ठेवावा व त्यामध्ये स्वच्छ पाणी आणि गंगाजल भरावे . त्यात दोन सुपार्‍या, दुर्वा, तुळशी पत्रे, दोन लाल फुले, एक/दोन रुपयाचे नाणे , सोन्याची अंगठी घालावी. त्या तांब्यावर पाच पानांचा आंब्याचा डहाळा ठेवावा. व त्यावर पानी असलेला नारळ शेंडी वर करून ठेवावा. तांब्यावर कुंकवाने स्वस्तिक काढावे. तांब्याला वेणी किंवा गजरा घालावा. मंगळसुत्र घालावे. पुष्पहार घालावा. कलशाला सर्व बाजुनी हळद कुंकुवाची बोटे ओढावीत. वरील चित्राप्रमाणे चौरंगावर सर्व देवदेवतांची मांडणी करून घ्यावी (जेवढे देव शक्य असतील तेवढे) व एका चौरंगावर सर्व देवदेवतांची मांडणी न झाल्यास दुसरा चौरंग वापरावा. पुजेला सुरुवात करण्यापुर्वी पुजेला उपस्थित असलेल्या आपल्यापेक्षा वयस्कर लोकांना नमस्कार करावा व आसनस्थ होऊन पुजेसाठी सुरुवात करावी.
 पुजेला बसल्यावर पुजा पुर्ण होईपर्यंत मधुनच उठु नये, कोणाशी बोलु नये. एकाग्र चित्ताने पुजेस प्रारंभ करून विधी पुर्ण  करावा.
१) पुजेसाठी लागणारे सर्व साहित्य एका स्वच्छ ताटामध्ये घेवुन आपल्या बाजुस ठेवावे.
२) पाण्याचा तांब्या, पंचपात्र,पळी व फुले आपल्या बाजुला ठेवा.
३) समई व निरांजन प्रज्ज्वलित करावीत.
 ४) उदबत्ती / धुपबत्ती लावावी. 
५) आपल्या बाजुला घंटा ठेवावी.
                                       ( प्रत्यक्ष श्रीलक्ष्मी आणि श्रीकुबेर पुजन विधी सुरु इथुन करावा ) 
                                                                     पुजेपुर्वी मनातील भाव
  हे श्रीसिद्धिविनायका गजानना, हे श्रीविष्णु देवता, हे श्रीमाता लक्ष्मी, हे श्रीकुबेर देवता, हे श्रीसरस्वती माता, हे सर्व नवग्रह देवता व इतर सर्व देवदेवता, तुमची माझ्याकडून भावपुर्ण पणे पुजा होऊ दे. पुजा करत असतांना माझे मन सातत्याने तुमच्या चरणी लीन राहु देत. प्रत्यक्ष माझ्या समोर आसनस्थ झाला आहात आणि मी तुमची पुजा करत आहे असा भाव सतत माझ्या मनात सु दे. पुजेतील संभाव्य विघ्ने दुर होऊन पुजेतील चैतन्य मला आणि येथील सर्व उपस्थितांना मिळू देत
।। श्रीगणेशाय नमः।।
पाठीचा कणा सरळ रेषेत ठेवुन बसावे व तीन वेळा दीर्घ श्वास घेऊन चौथे वेळी तीन मिनिटे श्वास रोखुन धरावा व देवतेच्या मुर्तीकडे एकाग्र दृष्टीने पाहावे व पुजेसाठी आपले मन एकाग्र करावे व खालील मंत्र म्हणावा.
॥ ॐ सर्वे भवंतु सुखिनः। सर्वे संतु निरामयाः। सर्वे भद्राणि पश्यंतु । माकश्चित् दुःख भाग्भवेत् ॥ ॥ ॐ शांतिःशांतिःशांतिः॥
।। आचमन विधि ।।
तांब्यातील पाणी पंचपात्रात घ्यावे. पळीने उजव्या हातावर पाणी घेवुन ते (१) ॐ केशवाय नम:  (२) ॐ नारायणाय नम: (३) ॐ माधवाय नम:  ही प्रत्येक नावे घेवुन प्रत्येक वेळी आचमन करावे (म्हणजे पाणी पिऊन टाकावे)  (४) ॐ गोविंदाय नम: हे नाव उच्चारुन पळीभर पाणी समोरच्या ताम्हनात सोडावे. त्यानंतर पुढील नावे हात जोडुन फक्त म्हणावीत. ॐ विष्णवे नम:, ॐ मधुसुदनाय नम:, ॐ त्रिविक्रमाय नम:, ॐ वामनाय नम:, ॐ श्रीधराय नम:, ॐ ह्रषीकेशाय  नम:, ॐ पद्मनाभाय नम:, ॐ दामोदराय नम:, ॐ संकर्षणाय नम:, ॐ वासुदेवाय नम:, ॐ प्रद्युम्नाय नम:, ॐ अनिरुध्दाय नम:, ॐ पुरुषोत्तमाय नम:, ॐ अधोक्षजाय नम:, ॐ नारसिंहाय नम:, ॐ अच्युताय नम:, ॐ जनार्दनाय नम:,ॐ उपेन्द्राय नम:,ॐ हरये नम:,ॐ श्रीकृष्णाय नम:    ।। पवित्रीकरण विधि ।।
 उजव्या हाताने डाव्या हातात पळीने पाणी घेवुन ते पाणी खालील मंत्र म्हणत उजव्या हाताने स्वत:वर, सर्व देवदेवतावर, चौरंगावर  शिंपडावे व बाह्याभ्यंतरः शुद्धी करावी.
।। ॐ अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोपि वा । यः स्मरेत् पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतरः शुचिः।। ॐ विष्णवे  विष्णवे विष्णवे नम
                                                           ।। आसनशुद्धी ।।          
  (उजव्या हातात पाणी घेवुन खालील पहिला मंत्र म्हणुन पाणी ताम्हनात सोडावे व परत पाणी घेवुन दुसरा मंत्र म्हणुन आसनावर पाणी शिंपडावे )
।। ॐ अस्य श्री आसन पुजनं महामंत्रस्यमेरूपृष्ठ ऋषिःसुतलं छंद: कुर्मो देवता पृथ्वी आसन पुजने विनियोग: ।।
।। ॐ पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृताः त्वां च धारय मां देवी पवित्रं कुरु च आसनं ।। 
                                                         ।। स्वस्तिपाठ ।।
ॐ मातृपितृचरण कमलभ्यो नम:।ॐ सिद्धि बुद्धि सहिताय चैतन्य श्रीमन्महागणाधिपतये नमः ।ॐ चैतन्य कुलपुरुषाभ्यो नमः।ॐ चैतन्य महापुरुषाभ्यो नमः। ॐ लक्ष्मीनारायणाभ्यां नम:।ॐ चैतन्य इष्टदेवताभ्यो नमः ।ॐ चैतन्य कुलदेवताभ्यो नमः ।ॐ चैतन्य ग्रामदेवताभ्यो नमः ।ॐ चैतन्य स्थानदेवताभ्यो नमः । ॐ चैतन्य वास्तुदेवताभ्यो नमः।ॐ चैतन्य आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः।ॐ चैतन्य सर्वेभ्यो देवेभ्यो नमः।ॐ चैतन्य सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। अविघ्नमस्तु ।
नमो भगवते वासुदेवाय कृष्णाय क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम: ॥                        भुर्भुवःस्वःतत्सवितुर्वरेण्यंभर्गो देवस्य धीमहिधियो यो नः प्रचोदयात् 
                                                                  ।। न्यासविधी ।।
गं गणपतये नमःअंगुष्ठाभ्यां नमः।ॐ नम शिवाय तर्जनीभ्यां नमः।ॐ नमो भगवते वासुदेवाय मध्यमाभ्यां नमः। ॐ श्री भैरोबादेव्यै नमःअनामिकाभ्यां नमः।ॐ श्री सुर्याय नमःकनिष्ठिकाभ्यां नमः।ॐ गं गणपतये नमः करतलकर पृष्ठांभ्यां नमः।ॐ श्री जुगाईदेव्यै नमः ह्रदयाय नमः। ॐ नम शिवाय शिरसे नमः।ॐ नमो भगवते वासुदेवाय शिखायै नमः। ॐ श्री भैरोबादेव्यै नमःकवचायै नमः।ॐ श्री सुर्याय नमः नेत्रत्रयाय वौषट ।ॐ नमो भगवत्यै महालक्ष्म्यै अस्त्राय फट ।ॐ भुर्भुवःस स्वरोमिति दिग्बंधः।
                                                                देशकालाचा उच्चार करणे
देशकाल : (पुजकाने आपल्या दोन्ही डोळ्यांना पाणी लावावे आणि पुढील देशकाल म्हणावा.)
     तिथिर्गुरुस्तथा वारं नक्षत्रं गुरुरेव च । योगश्चण करणं चैव सर्वं गुरुमयं जगत् ॥
                                           संकल्पसंकल्प घेणे म्हणजे काय?                                                                                   संकल्प घेणे म्हणजे आपण इंद्रदेवाला आणि स्वताला साक्षी ठेऊन अशी प्रतिज्ञा करतो, की मी हे कार्य इच्छापुर्तीसाठी करत असुन ते मी अवश्य पुर्ण करेल. संकल्प घेताना हातात पाणी घेतले जाते. कारण पंचमाहाभुतांपैकी (अग्नि, पृथ्वी, आकाश, हवा आणि पाणी ) गणपती हा पाण्याचा अधीपती आहे. शेवटी पाणी गणपती समोर ठेऊन पुजा कसल्याही अडथळ्या शिवाय पुर्ण होण्यासाठी संकल्प केला जातो . एकदा संकल्प केल्यानंतर ती पुजा करणे गरजेचे असते. यामुळे आपली संकल्प शक्ती वाढते आणि कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याचे धाडस प्राप्त होते.
 शास्त्रानुसार कुठलीही पुजा करण्याआधी संकल्प करणे गरजेचे असते पुजेच्या आधी संकल्प केला नाही तर पुजा सफल होत नाही. संकल्पाविना पुजा केल्यास इंद्रदेवाला त्याचे फळ मिळते असे सांगितले जाते त्यामुळे कुठलीही पुजा करण्याआधी संकल्प करणे गरजेचे आहे.
     उजव्या हातात अक्षता व पाणी घ्या आणि पुढील संकल्प म्हणा :
        मी ( स्वताचे नाव ) ( गावाचे नाव ) ग्रामे, शालिवाहन शके, (विक्रम) नाम संवत्सरे, (दक्षिणायन) अयने, (हेमंत) ऋतौ, (आश्विन) मासे, (कृष्ण)पक्षे, (अमावस्या) तिथी, (चित्रा) नक्षत्रे (कश्यप)गोत्र, (२७ ऑक्टोबर २०१९)दिने, (रविवार)दिवशी,  श्रीमहालक्ष्मी कुबेराच्या च्या प्रितीने माझे व माझ्या कुटुंबाचे दारिद्र्य (अलक्ष्मी) परिहार व्हावे व श्रीलक्ष्मी स्थिर राहावी, सर्वांगीण प्रगती मधील अडथळे अडचणी दुर व्हावेत, मला व माझ्या सर्व कुटुंबियांना पुष्कळ लक्ष्मीप्राप्ती व्हावी,भरपुर पैसा,सोने,चांदी मिळावे, माझे स्वताचे घर/फ्लँट व्हावा, मन:शांती, आयुष्य, आरोग्य, मंगल ऐश्वर्य, कुलाची अभिवृद्धि, सुख-समृद्धि आदि फलप्राप्ति व्हावी ह्यासाठी,( तसेच स्वताची अजुन जी काही इच्छा असेल तर ती बोलुन दाखवावी )प्रत्येक गोष्टीत निर्विघ्न यश मिळण्यासाठी श्रीलक्ष्मीपुजन आणि श्रीकुबेरपुजन करीत आहे तसेच ह्याबरोबर श्रीगणेश पुजन, श्रीविष्णु पुजन, नवग्रह पुजन, कलश पुजन, शंख पुजन, घंटा पुजन, दीप पुजन करीत आहोत. तर वरील सर्व गोष्टीत मला यश द्यावेत आणि काही चुकल्यास माफ करावे असा मी संकल्प करीत आहे.                                                                                                                                          याप्रमाणे संकल्प मंत्र म्हणुन हातातील अक्षता व पाणी ताम्हनात सोडावे.

                                                                                ।। गणपती पुजन ।।
॥ वक्रतुंड महाकाय कोटिसूर्य समप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
उजव्या हातात अक्षता घ्या (अक्षता मध्यमा,अनामिका,अंगुष्ठा एकत्र करून) आणि आवाहयामि म्हणतांना गणपतीवर वहाव्यात.
महागणपतये नमः महागणपतीं  सांगं सपरिवारं सायुधं सशक्तिकं आवाहयामि ।
महागणपतये नमः आसनार्थे अक्षतां समर्पयामि । (अक्षता वाहावी.)  महागणपतये नमः चंदनं समर्पयामि । (चंदन वाहावे )
                ऋद्धिसिद्धिभ्यां नमः । हरिद्रां समर्पयामि । (हळद वाहावी.)   ऋद्धिसिद्धिभ्यां नमः । कुंकुमं समर्पयामि । (कुंकू वाहावे.)    महागणपतये नमः, ऋद्धिसिद्धिभ्यां नमः । (सिंदूर वाहावा.)  महागणपतये नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि । (अक्षता वहाव्या.)
   महागणपतये नमः पुष्पं समर्पयामि । (फूल वाहावे.)  महागणपतये नमः दुर्वांकुरान् समर्पयामि । (दूर्वा वाहाव्या.)
              महागणपतये नमः धुपं समर्पयामि । (उदबत्ती ओवाळावी.)  महागणपतये नमः दीपं समर्पयामि । (निरांजन ओवाळावे.)
(उजव्या हातात दुर्वा घेऊन त्यावर पाणी घालावे. ते पाणी नैवेद्यावर शिंपडुन दुर्वा हातातच धरून ठेवाव्यात आणि आपल्या दोन्ही डोळ्यांवर डावा हात ठेवुन पुढील मंत्र म्हणत नैवेद्य समर्पण करावा.)
प्राणाय नमः । अपानाय नमः । व्यानाय नमः ॥ उदानाय नमः ॥ समानाय नमः ॥ ब्रह्मणे नमः ॥
( एक दुर्वा नैवेद्यावर ठेवावी आणि राहिलेल्या दुर्वा श्री गणपतीच्या चरणी वहाव्यात. हातावर पाणी घेऊन पुढील प्रत्येक मंत्र म्हणुन ते पाणी ताम्हणात सोडावे. )
महागणपतये नम: नैवेद्यं समर्पयामि ॥ मध्ये पानीयं समर्पयामि ॥ उत्तरापोशनं समर्पयामि ॥ हस्तप्रक्षालनं समर्पयामि ॥ मुखप्रक्षालनं समर्पयामि ॥ गंध फुल वहावे. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ॥
हात जोडा आणि प्रार्थना करा. - कार्यं मे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धातरि । विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि गणनायक ।                                             पळीभर पाणी घ्या आणि प्रीयतां म्हणतांना ताम्हणात पाणी सोडा.          अनेन कृत पुजनेन महागणपतिः प्रीयतां । हात पुसुन घ्या.  
        ।। नवग्रह पुजन ।।
“ ॥ ब्रम्हामुरारि: स्त्रिपुरांतकारी भानु, शशी, भुमिसुतो, बुधश्च, गुरुश्च, शुक्र, शनि, राहु, केतव: सर्वेग्रहा शांतीकरा भवन्तु ॥ ”
ॐ सुर्याय नम:। ॐ चंद्रमसे नम:। ॐ भौमाय नम:। ॐ बुधाय नम:। ॐ गुरवे नम:। ॐ शुक्राय नम:। ॐ शनैश्चराय नम:।  ॐ राहवे नम:। ॐ केतवे नम:।
असे प्रत्येक ग्रहांचे नाव घेत प्रत्येक सुपारींना (नवग्रहांना) गंध, अक्षता, फुले वाहावीत, उदबत्ती दिवा दाखवावा आणि मनोभावे नमस्कार करावा.
                                                                   ।। श्रीविष्णु (बाळकृष्ण) पुजन ।।
नंतर श्रीविष्णुंचे ध्यान करावे व म्हणावे.
“ शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं । विश्वाधारं गगनसदृशं मेघ वर्ण शुभांगम ।।
लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्य । वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं ।। ”
                      नारायण नारायण, ॐ नमो विष्णवे नमः, ॐ नमो भगवते वासुदेवाय,                                                           ॐ व्यंकटेश्वराय नमो नमः श्रीमन नारायण नमो नमः तिरूमल तिरुपती नमो नमः जय बालाजी नमो नमः   
    असे म्हणुन बाळकृष्ण मुर्तीला किंवा फोटोला गंध,अक्षता,फुले वाहावीत,उदबत्ती दिवा दाखवावा व मनोभावे नमस्कार करावा.
                                                                     ।। श्री सरस्वती पुजन ।।
                                                             नंतर श्री सरस्वती देवीचे ध्यान करावे व म्हणावे.
नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनि त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं  देहि मे 
असे म्हणुन मुर्तीला किंवा फोटोला गंध,अक्षता,फुले वाहावीत,उदबत्ती दिवा दाखवावा आणि मनोभावे नमस्कार करावा.
                                                                         ।। कलश पुजन ।।
गंगे च युमने चैव गोदवरी सरस्वति । नर्मदे सिंधु कावेरि जलेस्मिन सन्निधिं कुरु ॥ कलशाय नमः ।
“ वरुणाय नम:। कलश देवताभ्यो नम:। सकलपुजनार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि ।।
कला कला हि देवानां दानवानां कला कला: । संगृह्य निर्मितो यस्मात कलशस्तेन कथ्यते ॥१॥
कलशस्य मुखे विष्णुः कण्ठे रुद्रः समाश्रितः । मुले त्वस्य स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः ॥२॥
कुक्षौ तु सागराः सप्त सप्तद्वीपा च मेदिनी । अर्जुनी गोमती चैव चंद्रभागा सरस्वती ॥३॥
कावेरी कृष्णः वेणा च गंगा चैव महानदी । तापी गोदावरी चैव माहेन्द्री नर्मदा तथा ॥४॥
नदाश्च विविधा जाता नद्यः सर्वास्तथापराः । पृथिव्यां यानि तीर्थानि कलशस्थानि तानि वै ॥५॥
सर्वे समुद्राः सरित तीर्थानि जलदा नदाः । आयांतु मम शांत्यर्थं दुरितक्षयकारकाः ॥६॥
ऋग्वेदोथ यजुर्वेदः सामवेदो ह्यथर्वणः । अगैश्च सहिताः सर्वे कलशांबुं समाश्रिताः ॥७॥
अत्र गायत्री सवित्री शान्तिः पुष्टिकरी तथा । आयांतु देवपुजार्थं दुरीतक्षयकारकाः ॥८॥
कलशदेवताभ्यो नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥
असे म्हणुन कलशाला गंध,अक्षता,फुले वाहावीत, उदबत्ती दिवा दाखवावा आणि मनोभावे नमस्कार करावा.
                                                                    ।। शंख पुजा ।।    (शंखामध्ये पाणी असावे)
शंख चंद्रार्क दैवत्यं मध्ये वरुण दैवतं । पृष्ठे प्रजापति विद्यात् अग्रे गंगा सरस्वती ॥
त्वं पुरा सागरोत्पन्नः विष्णुना विधृतः करे । पुजितः सर्व देवैश्च पांचजन्य नमोस्तुते ॥
त्रैलोक्ये यानि तीर्थानि वासुदेवस्य च आज्ञया । शंखे तिष्ठन्ति विप्रेन्द्र तस्मात शंख प्रपुजयेत् ॥
ॐ पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमही । तन्नो शंख: प्रचोदयात ।।
शंखदेवताभ्यो नम: । सकल पुजार्थे गंधपुष्प समर्पयामि ।।
असे म्हणुन शंखाला गंध,अक्षता,फुले वाहावीत,उदबत्ती दिवा दाखवावा आणि मनोभावे नमस्कार करावा.
                                                                   ।। घंटा पुजा ।।                                                                                                      आगमार्थं तु देवानां गमनार्थं  तु रक्षसाम्‌ । घंटारवं करोम्यादौ देवताहवान लांच्छनम 
 । घंटायै नम: सर्वोपचारार्थे गंधाक्षतापुष्पं समर्पयामि
असे म्हणुन घंटेला गंध,अक्षता,फुले वाहावीत,उदबत्ती दिवा दाखवावा आणि मनोभावे नमस्कार करावा.
                                                                        ।। दिप पुजा ।।
शुभं करोति कल्याणं  आरोग्यं धनसंपदा  शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते 
दिपज्योतिःपरब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः  दीपो हरतु मे पापं दिपज्योतिर्नमोस्तुते 
सकलपुजार्थे गंधाक्षतापुष्पं समर्पयामि ।।
असे म्हणुन दिव्याला गंध,अक्षता,फुले वाहावीत,उदबत्ती दाखवावी आणि मनोभावे नमस्कार करावा.
 ।। झाडु पुजा ।।
झाडु वरती हळद कुंकू वहावे आणि धुप आणि दीपाने पुजा करावी. (झाडुला सुध्दा लक्ष्मी स्वरूप मानले आहे ) 


                                                    श्री लक्ष्मीकुबेर पुजन 
                                                श्री लक्ष्मीकुबेराचे ध्यान करावे : 
कापुराच्या चुर्णाप्रमाणे शुभ्र असणार्‍या शुभ्रवस्त्र नेसलेल्या मुक्ताभरणांनी विभूषित कमळामध्ये निवास करणार्‍या स्मित मुखारविंद असलेल्या शरद ऋतूतील चंद्रकलेप्रमाणे सौंदर्य असणार्‍या पाणीदार डोळे असणार्‍या चतुर्भुज असणार्‍या जिने दोन करकमळामध्ये कमळे आणि दोन हातांनी अभय अन् वरदमुद्रा धारण केल्या आहेत. आणि जिला दोन हत्ती आपल्या शुंडेतील पाण्याने सर्व बाजुनी अभिषेक घालतील. अशा महालक्ष्मीचे मी ध्यान करतो. 
टीप : १. शास्त्रोक्त मंत्रपठण करणे प्रत्येकालाच शक्य नसते. त्यामुळे कोणत्याही पुजकाला सहज पठण करता येईल, अशी नाममंत्रयुक्त पूजा पुढे देत आहोत. प्रत्येक नाममंत्राखाली मुळ शास्त्रोक्त मंत्र न देता त्यांचा केवळ अर्थ दिलेला आहे. अर्थ समजल्यामुळे पुजकाला भावपुर्ण पुजन करणे सुलभ होईल. 
२. आवाहयामि आणि समर्पयामि हे शब्द उच्चारतांनाच पुजकाने उपचार समर्पित करावा.
आवाहन : ॥ श्री महालक्ष्मी समागच्छ पद्मनाभपदादिह । पुजामिमां गृहाण त्वं त्वदर्थं देवि संभृतां ॥ अर्थ : हे श्री महालक्ष्मी,श्रीविष्णुच्या चरणकमलापासुन तुम्ही येथे या आणि तुझ्यासाठी एकत्रित केलेल्या पुजेचा स्वीकार करा.उजव्या हातात अक्षता घ्या (प्रत्येक वेळी अक्षता वाहताना मध्यमा, अनामिका आणि अंगुष्ठ एकत्र करूनच वाहाव्यात.) 
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः आवाहयामि ॥ 
आसन : श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ॥ (श्री लक्ष्मीकुबेराच्या चरणी अक्षता वाहाव्यात.) 
अर्थ :हे माता लक्ष्मी, तुम्ही कमळामध्ये निवास करता तेव्हा माझ्यावर कृपा करण्यासाठी तुम्ही या कमळामध्ये निवास करा.   
(पुजेसाठी चित्र असल्यास फुलाने अथवा तुळशीपत्राने पाणी प्रोक्षण (शिंपडावे) करावे. मुर्ती अथवा प्रतिमा असल्यास आपल्यासमोर ताम्हणामध्ये ठेवुन पुढील उपचार समर्पित करावेत.) 
पाद्य : श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः पाद्यं समर्पयामि ॥ (उजव्या हाताने पळीभर पाणी श्री लक्ष्मीच्या चरणी घालावे.) 
अर्थ : प्रवासाचे सर्व श्रम दुर व्हावे म्हणुन गंगोदकाने युक्त नाना मंत्रांनी अभिमंत्रित केलेले पाणी पाय धुण्यासाठी देतो.
आचमन : श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः आचमनीयं समर्पयामि ॥ (उजव्या हाताने पळीभर पाणी श्री लक्ष्मीच्या चरणी घालावे.) 
अर्थ : हे जगदंबिके, कापुर, अगरु यांनी समिश्र असे थंड आणि उत्तम असे पाणी तुम्ही आचमन करण्यासाठी ग्रहण करा. 
स्नान : श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः स्नानं समर्पयामि ॥ (उजव्या हाताने पळीभर पाणी श्री लक्ष्मीच्या चरणी घालावे.) 
अर्थ : हे श्री महालक्ष्मी, कापुर, अगरु यांनी सुवासित असे सर्व तीर्थांतुन आणलेले पाणी तुम्ही स्नानासाठी ग्रहण करा. 
पंचामृत : श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः पंचामृतस्नानं समर्पयामि॥ तदंते शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।  (दुध, दही, तुप, मध व  साखर एकत्र केलेले देवीच्या चरणी वाहावे. त्यानंतर पळीभर शुद्ध पाणी घालावे.) 
अर्थ : हे देवी, मी दिलेले दुध, दही, तुप, मध आणि साखर यांनी युक्त असलेले पंचामृत स्नानासाठी ग्रहण करा.   
गंधाचे स्नान : श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः गंधोदकस्नानं समर्पयामि ॥                                                                                        (पळीभर पाणी घ्यावे. त्यात गंध घालुन ते पाणी देवीच्या चरणी वाहावे.) 
अर्थ : सुगंधित द्रव्यांनी युक्त असे मी दिलेले हे गंधाचे पाणी स्नानासाठी ग्रहण करा.    
महाभिषेक : ( श्रीसुक्तचा पाठ वाचुन अभिषेक करावा.)      त्यानंतर मुर्ती अथवा प्रतिमा आपल्यासमोर ताम्हणात घेतली असल्यास स्वच्छ धुऊन पुसुन परत मुळ स्थानी ठेवावी आणि पुढील पुजा करावी. 
वस्त्र : श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासनिर्मिते वस्त्रे समर्पयामि ॥ (देवीला कापसाचे वस्त्र आणि उपवस्त्र वाहावे.)
अर्थ : तंतुच्या सातत्यामुळे तंतुमय आणि कलाकुस युक्त, शरिराला अलंकृत करणारे असे श्रेष्ठ वस्त्र हे देवी तुम्ही परिधान करा.  
कंचुकीवस्त्रं : श्री लक्ष्म्यै नमः कंचुकीवस्त्रं समर्पयामि ॥ (उपलब्धतेनुसार चोळी अर्पण करावी.) 
अर्थ : हे विष्णु वल्लभे (अनमोल) अमोल अशी चोळी मी तुम्हाला देतो आहे. 
गंध : श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ॥ (गंध लावावे.) 
अर्थ : मलय पर्वतावर झालेले, अनेक नागांनी रक्षण केलेले अत्यंत शीतल आणि सुगंधीत असे हे चंदन स्विकार कर. 
हळदकुंकू : श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः हरिद्रां कुंकुमं समर्पयामि ॥ (हळदकुंकू वाहावे.) 
अर्थ : हे ईश्‍वरी मी आणले हे ताटंक हळदीकुंकू, अंजन, सिंदूर आदी सौभाग्यद्रव्याचा स्वीकार करा. 
अलंकार : श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः अंलकारार्थे नानाभरणभुषणानि समर्पयामि ॥ (उपलब्धतेनुसार सौभाग्यालंकार अर्पण करावे.) 
अर्थ : हे देवी , रत्नजडीत कंकणे, बाजुबंद, कमरपट्टा, कर्णभुषणे,पैंजण, मोत्यांचा हार, मुकुट आदी अलंकार तुम्ही धारण करा.             ( हे सर्व घालण्याची गरज नाही, आपणास जे जे शक्य आहे ते ते ठेवले तरी चालेल.)
पुष्प : श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । पुजार्थे ऋतुकालोद्भवपुष्पाणि तुलसीपत्राणि दुर्वांकुरांश्‍च समर्पयामि ॥                                            (फुले, तुळशी, बेल, दुर्वा तसेच उपलब्धतेनुसार पत्री अर्पण करावी.)
अर्थ : हे माता लक्ष्मी, प्राप्त झालेल्या सुगंधामुळे आनंदित आणि मत्त अशा भ्रमरांच्या समुहामुळे व्यापलेला नंदनवनातील फुलांचा संचय तुम्ही घ्या.
धुप : श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः धुपं समर्पयामि ॥ (उदबत्ती ओवाळावी.) 
अर्थ : हे देवी, अनेक झाडांच्या रसापासुन उत्पन्न झालेल्या सुगंधीत गंधांनी युक्त, जो देव, दैत्य व मानवांनाही आनंदकारक आहे. अशा धुपाला तुम्ही ग्रहण करा. 
दीप : श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः दीपं समर्पयामि ॥ (नीरांजन ओवाळावे.) 
अर्थ : सुर्य मंडल, अखंड चंद्र बिंब आणि अग्नि यांच्या तेजाला कारणीभुत असणारा, असा हा दीप मी भक्तीस्तव तुम्हाला सादर केला आहे.                        (उजव्या हातात तुळशीपत्र / बेलाचे पान / दुर्वा घेऊन त्याच्यावर पाणी घालावे. ते पाणी नैवेद्यावर शिंपडून तुळशीचे पान हातातच धरून ठेवावे आणि आपल्या दोन्ही डोळ्यांवर डावा हात ठेवुन नैवेद्य दाखवित पुढील मंत्र म्हणत नैवैद्य समर्पण करावा.)(लवंग, वेलची, साखर घातलेले दुध तसेच लाडु यांचा नैवेद्य दाखवावा.)
नैवेद्य : श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः नैवेद्यार्थे ऐला लवंग शर्करा दिमिश्रगोक्षीर लड्डुकादि नैवेद्यं समर्पयामि ॥ प्राणाय नमः ॥ अपानाय नमः ॥ व्यानाय नमः ॥ उदानाय नमः ॥ समानाय नमः ॥ ब्रह्मणे नमः हातातील तुळशी देवीच्या चरणी वाहाव्या. 
   ( नंतर उजव्या हातावर पाणी घेऊन पुढील प्रत्येक मंत्र म्हणून ते पाणी ताम्हणात सोडावे.) ॥ नैवेद्यं समर्पयामि ॥ मध्ये पानीयं समर्पयामि ॥ उत्तरापोशनं समर्पयामि ॥ हस्तप्रक्षालनं समर्पयामि ॥ मुखप्रक्षालनं समर्पयामि ॥ करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ॥              (देवीला गंधफुल वाहावे.) 
अर्थ: स्वर्ग पाताळ आणि मृत्युलोक यांना आधार असणारे धान्य व त्यापासुन तयार केलेला सोळा आकारांचा नैवेद्य आपण स्वीकार करावा.
फल : श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः मुखवासार्थे पुगीफलतांबुलं समर्पयामि ॥                                                                                 ( पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन ते विडा, सुपारी यांवर सोडावे.) 
अर्थ : हे देवी, हे फळ मी तुम्हाला समर्पण करण्यासाठी ठेवतो, त्यामुळे प्रत्येक जन्मामध्ये मला चांगल्या फलांची प्राप्ती होवो. कारण या चराचर त्रैलोक्यामध्ये फळामुळेंच फलप्राप्ती होतांना दिसते म्हणुन या फलप्रदानामुळे माझे मनोरथ पुर्ण होवोत.
तांबुल : अर्थ : हे देवी, मुखारविंदांचे भुषण असणारा, अनेक गुणांनी युक्त असणारा, ज्याची उत्पत्ति पाताळात झाली, असा माझ्याकडून दिला जाणारा विडा तुम्ही ग्रहण करा. 
आरती : श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः महानीरांजनदीपं समर्पयामि ॥ (देवीची आरती म्हणावी आणि नंतर कापुर दाखवावा.)                     ( देवीची आरती इथे देत नाही आपण ती धार्मिक पुस्तकातील बघुन म्हणावी ) 
अर्थ : चंद्र,सुर्य,पृथ्वी,वीज,अग्नी यांमध्ये असणारे तेज हे तुमचेच आहे. (अशी किती ही तेजे तुमच्यावरून ओवाळुन टाकावी.) 
नमस्कार : श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः नमस्कारान् समर्पयामि ॥ (देवीला नमस्कार करावा.) 
अर्थ : इंद्रादि देवताच्यां शक्ती असणार्‍या, त्याचप्रमाणे महादेव, महाविष्णु, ब्रह्मदेवाची शक्ती असणार्‍या, मंगलरूप असणार्‍या, सुख करणार्‍या अशा हे मुळ प्रकृतिरूप असणार्‍या देवी तुम्हाला आम्ही सर्व नम्र होऊन सतत नमस्कार करतो.
प्रदक्षिणा : श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः प्रदक्षिणान् समर्पयामि ॥ (स्वत:भोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात.) 
अर्थ : मी जी जी काही पातके या जन्मात अथवा अन्य जन्मांत केली असतील, ती ती सर्व पातके प्रदक्षिणेच्या प्रत्येक पावलो पावलीं नष्ट होतात. तुम्हीच माझा आश्रय आहात तुमच्याशिवाय माझा रक्षणकर्ता दुसरा कुणीही नाही; म्हणुन हे जगदंबे! करूण भावाने तुम्ही माझे रक्षण करा. 
मंत्रपुष्पाजंली : श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि ॥                                                                                  (गंध, फुल व अक्षता घ्या व समर्पयामि म्हणतांना दोन्ही हातांच्या ओंजळीने देवीच्या चरणी वहाव्यात.)
अर्थ : हे माता लक्ष्मी, विष्णुच्या धर्मपत्नी तुम्ही ही पुष्पांजली घ्या आणि या पुजेचे यथायोग्य फल मला प्राप्त करून द्या. 
प्रार्थना : या देवी सर्वभुतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥                                                      (हात जोडुन देवीची आणि कुबेराची प्रार्थना करावी.) 
( हे विष्णुप्रिये तुम्ही वर देणारी आहात, तुम्हाला मी नमस्कार करतो, तुम्हाला शरण आलेल्यांना जी गती प्राप्त होते, ती गती तुमची पुजा केल्याने मला प्राप्त होवो. जी देवी माता लक्ष्मी (तेजाच्या सौंदर्याच्या) रूपाने सर्व भुतांत निवास करते. त्यांना मी त्रिवार (तीन वेळा) नमस्कार करतो. संपत्तीच्या राशींचा अधिपती असणार्‍या हे कुबेरा, तुम्हाला मी नमस्कार करतो. तुमच्या प्रसन्नतेने मला धनधान्य संपत्ती प्राप्त होवो.)     अनेन कृतपुजनेन श्री लक्ष्मीकुबेरो प्रीयेताम् ।                                                                               (असे म्हणुन हातात अक्षता घेऊन त्यावर पाणी घालून ताम्हणात सोडुन दोनदा आचमन करावे.)

॥ श्रीकुबेर पुजन ॥
।। ॐ श्रीकुबेराय नमः ।।
विनियोग- अस्य श्रीकुबेर महामंत्रस्य श्रीविश्रवा ऋषि:बृहती छन्द: शिवमित्र श्रीधनेश्वरो देवता समाभीष्टसिद्धयर्थे जपे विनियोग:।।
ध्यान- मनुजवाह्य विमानवरस्थितं गरुडरत्ननिभं निधिनायकं । शिवसखं मुकुटादि विभुषित वरगदे दधतं भज तुंदिलनं  ।।
प्रार्थना– देवी प्रियश्च नाथस्य कोषाध्यक्ष महामते । ध्यायेहं प्रभुं श्रेष्ठं कुबेर धनदायकं ।। क्षमस्व मम दौरात्म्यं कृपासिंधो सुरःप्रिय।
धनदोसि धनंदेही अपराधान्श्च नाशय । महाराज कुबेर त्वं भुयो भुयो नमाम्यहं । दिनोपी चदया यस्त जायतु वै महाधन ।।
॥ श्री कुबेराय नम ॥
।। ॐ श्रीं वित्तेश्वराय: नम: ।।
।। ॐ श्रीं ॐ ऱ्हीं श्रीं ऱ्हीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय: नम: ।।
॥ ॐ यक्षराजाय विद्महे, वैश्रवनाय धीमहि, तन्नो कुबेर प्रचोदयात् ॥
॥ॐ यक्षराजाय विद्महे अलकाधीशाय धीमहि । तन्नो कुबेरः प्रचोदयात् ॥
॥ ॐ ऱ्हीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धनं पुरय पुरय नमः॥
॥ कुबेर त्वं धनाधीश गृहे ते कमला स्थिता त्वां देवी प्रेष आशुत्वं मदगृहे ते नमो नमः ॥
।। ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय, धन धान्यधिपतये धन धान्य समृद्धि मे देहि दापय स्वाहा ।।
श्रीसुवर्णवृष्टिं कुरु मे गृहे श्रीकुबेर । महालक्ष्मी हरिप्रिया पद्मायै नमः । राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
समेकामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु । कुबेराज वैश्रवणाय महाराजाय नमः ॥
। ॐ द्रव्यनिधिस्थान-कुबेराय नमः । ध्यान-आवाहनादि सकल पुजार्थे हरिद्राकुंकुम गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि ।                          ( ताम्हनात ठेवलेल्या कुबेराच्या मुर्तीची किंवा चांदीच्या नाण्यांची, दागिन्यांची, नोटांची धनपति कुबेर म्हणुन पुजा करावी. संपत्तीवर गंधाक्षता व फुले वाहावीत . नमस्कार करावा.)
घरातील किंवा व्यापार-उद्योगातील तिजोरी,कॅशबॅाक्स-गल्ला इत्यादीत ओल्या कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढावे व त्यानंतर अख्खे धने, सात हळकुंडे, पाच कमलगट्टे, सोने चांदी व रुपये तिजोरीत/गल्यात ठेवावेत व नंतर “ ॐ कुबेराय नम: ” हा मंत्र म्हणुन त्यांची पुजा करावी. त्यानंतर “ ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य धीपतये धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा ”  हा मंत्र ११ वेळा म्हणावा. (हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे, दर बुधवारी म्हणावा, कुबेरांची कृपा नेहमी राहील.)                                                        कलम/पेन/दौतीची पुजा:- ( हात जोडुन खालील श्लोक म्हणावा )
ॐ काल्यै नमः। ॐ कपालिन्यै नमः। ॐ फुल्लायै नमः। ॐ कुरूकुलायै नमः। ॐ विरोधिन्यै नमः। ॐ विप्रचितायै नमः। ॐ उग्रप्रदत्तायै नमः। ॐ नीलायै नमः। ॐ धनायै नमः। ॐ बलाकायै नमः। ॐ मात्रायै नमः। ॐ मुद्रायै नमः। ॐ महाकाल्यै नमः। सर्वोपचारार्थे गंधाक्षतान हरिद्राकुंकुम पुष्पं च समर्पयामि । 
(कलम/पेन/लेखणी/दौतीवर लाल गंध, अक्षता, हळदकुंकू व फुले वाहावीत व नमस्कार करावा.)  
 तुला (तराजु व वजने-मापे यांची ) पुजा:-  ( हात जोडुन खालील श्लोक म्हणावा )
 नमस्ते सर्व देवांना शक्तित्वे सत्यमाश्रिता । साक्षिभुता जगद्धात्रि निर्मिता विश्वयोनिना । तुलायै नमः। सकलपुजार्थे गंधाक्षतपुष्पाणि हरिद्राकुंकुमं च समर्पयामि.     (तराजु व वजने-मापे यांवर लाल गंध, अक्षता, हळदकुंकू व फुले वाहावीत व नमस्कार करावा.) 
   तिजोरी पुजन:-  ॐ धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपाय च । भवंतु त्वत्प्रसादान्मे धनधान्यादि संपदः ”
कुबेराय नमस्तुभ्यं । सकलपुजार्थे गंधाक्षतपुष्पाणि हरिद्राकुंकुमं च समर्पयामि ।  
( तिजोरीवर सकलपुजार्थे गंध, अक्षता, हळदकुंकू व फुले वाहावीत व नमस्कार करावा.)
नंतर उभे राहुन स्वताभोवती प्रदक्षिणा घालुन हातातील पुष्पे श्री महालक्ष्मीच्या/श्री कुबेराच्या चरणी अर्पण करावीत. नंतर महानैवैद्य म्हणुन घरात तयार केलेले फराळाचे गोड पदार्थ शिवाय पुजनासाठी खास आणलेले पेढे, बत्तासे, लाह्या देवीसमोर ठेवुन त्याभोवती पाणी सोडावे त्यानंतर श्री सुक्त , आरती, महालक्ष्माष्टक म्हणावे.                                                               
(रात्री निजण्यापुर्वी (सुपारीवर) गणपतीवर गंधाक्षता व फुल वाहावे.) -
यांतु देवगणा सर्वे पूजामादाय मामकीम् । इष्टकाम-प्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च ॥
अशा प्रकारे गणपतीचे विसर्जन करावे. इतर देवतांचे, देवीचे व वह्या तराजु, इत्यादींचे विसर्जन नाही.

  विसर्जन ॥
दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून सर्व दैवतांवर गंध हळदकुंकू,फुले,अक्षता वाहाव्यात. नंतर नारळ फोडुन पाणी त्यांच्यावर शिंपडावे.विडा दक्षिणा ठेवावी, आपल्या संकल्पातील/मनातील सर्व इच्छा पुर्ण कराव्यात हे मागणे करावे.
निर्माल्य मोठ्या जलाशयात टाकावे. पुजेची उपकरणे पुन्हा घरात जागी ठेवावी. मुर्ती, तसबिरी घरात होत्या तेथे ठेवाव्यात. ब्राह्मणाला तांदुळ, वस्त्र, फळे, दक्षिणा, लोकांनी अर्पण केलेले द्रव्य आदि जे योग्य ते द्यावे (जर ब्राम्हणाद्वारे पुजा केली असल्यास). धन, नाणी, दागिने आदि काळजीपुर्वक उचलुन जागच्या जागी व्यवस्थित ठेवावेत.

॥ इति पुजाविधिः समाप्तं ॥
संकलक : श्री सुरेश साधु घारे                                                                                                                                                                                       ( वरील सर्व पुजाविधींची माहिती वेगवेगळी पुस्तके आणि वेगवेगळ्या वेबसाईटस वरुण एकत्रित केलेली आहे त्यामुळे वरील संकलक कोणत्याही गोष्टीसाठी जबाबदार रहाणार नाही )